केडीएमसी आरोग्य विभाग, आयएमएच्या वतीने
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व आयएमए कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात आरोग्य विभाग, रुग्णालये तसेच विविध यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद, रुग्ण व्यवस्थापन, अग्निसुरक्षा तसेच बचावकार्य याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. आयुक्त अभिनव गोयल यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयामधील, नागरी आरोग्य केंद्रे व आरोग्यवर्धिनी केंद्रांमधील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू कर्मचारी तसेच अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेमुळे आपत्ती व्यवस्थापनाबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण होऊन आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत अधिक तयारी व समन्वय वाढण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
००००००००००
