ईडीकडून आता खरातला पाहुणचार
हरिभाऊ लाखे
नाशिक – भल्याभल्यांची मती गुंग करुन त्यांची आर्थिक फसवणूक आणि शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरातची आता ईडी चौकशी होणार आहे. अशोक खरातचा ताबा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) घेतला असून ईडीचे विशेष पथक त्याला नाशिकहून मुंबईकडे घेऊन गेले. अशोक खरातला पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले असता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कोठडीची मागणी केली होती, ईडी विरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे अशोक खरातने कोर्टात सांगितले.
ईडीकडून अनेक बाबी मांडण्यात आल्या. त्यात समता नागरी क्रेडिट सोसायटीमध्ये अशोक खरातने अनेकांच्या नावाने ६३ खाती उघडली, परंतु, त्या सर्व खात्यांना नंबर खरातचा जोडला होता. वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव होते. सर्व खात्यांचा लाभार्थी देखील अशोक खरात होता. कोट्यवधी रुपये बँकांमध्ये रोख स्वरुपात भरण्यात आले. आणि तसेच ते काढलेही गेले. इतक्या खात्यांमध्ये एवढे पैसे कुठून आले आणि ते कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित करुन या पैशांच्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे, हा सर्व तपास करणे बाकी आहे. पैसे भरण्याची कोणतीही (डिपॉझिट स्लिप: पावती न भरता रोखपालाच्या (कॅशियर) मदतीने थेट रोकड खात्यांमध्ये जमा करण्यात आली. एका संस्थेचा तर खरातच अध्यक्ष होता, यादरम्यान ३४ बेनामी एफडी खाती उघडण्यात आली. रोख स्वरुपातच संबंधित खात्यांमधून पैसे काढले गेले. २०१४-२०२४ या कालावधीत हा सर्व उद्योग सुरु होता. एफडीचे पैसे अशोक खरातकडेच पुन्हा आल्याने तोच मुख्य आरोपी आहे, असा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला.
खरात याच्या पत्नीच्या खात्यात आणि तिच्या नावाने देखील मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मालमत्ता दाखविण्यात आली आहे. बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी करणे बाकी आहे. आरोपींची चौकशी करणे गरजेचे असल्याचे ईडीने नमूद केले. ६० नावे वापरून बँक खाती उघडल्याचा आरोप आहे. सर्व खातेदारांनी खरातलाच कसे वारसदार केले, असा प्रश्न न्यायालयाने खरातच्या वकिलांना विचारला असता खरातच्या वकिलांनी, हा काही गुन्हा नाही. १० दिवसांच्या कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद केला.. खरातला त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहत खरातने स्वतःची बाजू मांडली. बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांनी मला काही पैसे आल्याचे सांगितले होते. आवारे यांनी पैसे बँकेत ठेवल्यास ९ टक्के व्याज मिळेल, असे सांगितले. याशिवाय मला कोणतीही माहिती नाही. फक्त व्याज चांगले मिळते म्हणून व्याजासाठी हे केले, असे खरातने सांगितले.
खरातला २६ मेपर्यंत ईडी कोठडी
अशोक खरातला २६ मेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने १० दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने सहा दिवसांची कोठडी दिली. कोठडीत चौकशी दरम्यान खरातकडून ईडीला काही वेगळी माहिती मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत न्यायालय, पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी अशा फेऱ्या मारणाऱ्या अशोक खरातला आता ईडीचाही पाहुणचार करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *