जगण्यातील मूल्य नवीन पिढीमध्येही हे रुजवण्याचा प्रयत्न करा – धर्मगुरू कृष्ण गौर दास
कल्याण : हिंदू सकल समाज, कर्णिक रोड समितीच्या वतीने भव्य ‘हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. धर्मगुरू कृष्ण गौर दास यांनी ‘हिंदुत्व व सद्यपरिस्थिती’ या विषयावर भाष्य करताना आपल्या संस्कृतीची जोपासना करताना आपण कोणत्याही प्रांतातले असू पण प्रथम आपण हिंदू आहोत हे विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श राजानेही राम आणि कृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. त्यामुळे जगण्यातील मूल्य, शरीराची अंतर्बाह्य जोपासना ही आपल्या ग्रंथानीच होते हे विसरू नका आणि नवीन पिढीमध्येही हे रुजवण्याचा प्रयत्न करा असे त्यांनी आपल्या विवेचनात संगितले.
डॉ. रुपाली जोशी ‘महिला सशक्तिकरण’ या विषयावर मार्गदर्शन करताना “आजच्या काळात स्त्री एकटी का पडते आणि तिला बाहेर आधार का शोधावा लागतो?” याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले. अनिल भालेराव यांनी संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाच्या प्रवासावर आणि भविष्यातील ध्येयांवर प्रकाश टाकला. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, आत्मबोध, पर्यावरण संरक्षण अशा विविध विषयांवर भाष्य करत त्यांनी प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल यावर मार्गदर्शन केले.
केवळ व्याख्यानेच नव्हे, तर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कलाप्रकार या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. कार्यक्रमाच्या सुरवातीला गोमाता, भारतमाता यांचे पूजन करून शंखनाद करण्यात आला. नवीन पिढीतील बाल आणि युवा कलाकारांनी नांदी, पोवाडा, शौर्य गीत, बासरी आणि तबला वादन तसेच गणेश वंदना (नृत्य) सादरीकरण केले. योगाभ्यासावरील प्रात्यक्षिक हिमगौरी प्रमोद शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले.
समाजात ऐक्य निर्माण करणे आणि सद्यस्थितीत हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंदू सकल समाज, कर्णिक रोड समितीच्या अध्यक्ष डॉ आशिष एकलहरे, उपाध्यक्ष नितीन अहिरराव, रवींद्र वाणी, सचिव प्रमोद शेट्टी, उपसचिव महेश दीक्षित, उपसचिव जयश्री कोलते, कोषध्यक्ष सीए मनोहर नेवे व सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
००००००००००००००
