खासगी एजन्सीद्वारे थेट लिलावाची मोहीम
ठाणे : शहरातील रस्ते आणि मोकळ्या मैदानात वर्षानुवर्षे पडून असलेल्या बेवारस व नादुरुस्त वाहनांवर आता ठाणे महापालिकेने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. खासगी एजन्सीच्या माध्यमातून वाहनमालकांचा शोध घेऊन नोटिसा बजावल्या जाणार असून, प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित वाहनांचा थेट लिलाव करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
ठाणे शहराच्या रस्त्यावर आणि मोकळ्या मैदानात पडून असलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे शहराचे विद्रूपीकरण होण्याबरोबरच वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिकेने पुणे महापालिकेच्या धर्तीवर नियोजनबद्ध मोहीम हाती घेतली आहे. पालिकेकडून यापूर्वी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही रस्त्यांवरील भंगार वाहनांचा प्रश्न कायम राहिला होता. त्यामुळे आता ‘मे. गंगामाता वाहन शोध संस्था’ या खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित संस्थेकडून वाहनांचा तपशील शोधणे, मालकांशी संपर्क साधणे, नोटिसा बजावणे, आरटीओकडून माहिती मिळवणे तसेच पुढील लिलाव प्रक्रिया राबवणे अशी संपूर्ण जबाबदारी पार पाडली जाणार आहे.
सध्या ठाणे महापालिकेकडून उचलण्यात आलेली अनेक बेवारस वाहने पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील बाटा कंपाऊंड, खारेगाव पारसिकनगर तसेच मुंब्रा अग्निशमन केंद्रामागील मोकळ्या जागेत ठेवण्यात आली आहेत. या वाहनांची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, वाहनांचे नंबर उपलब्ध नसल्यास इंजिन किंवा चेसिस क्रमांकावरून मूळ मालकांचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर वाहनमालकांना दोन वेळा नोटीस पाठवली जाईल. तरीही वाहन हटवले नाही, तर संबंधित वाहनांचा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत दर ठरवून लिलाव करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक परवानग्या संबंधित संस्थेने घेतल्या असून, ठाणे महापालिका, आरटीओ आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जाणार आहे.
वाहतूक व्यवस्थेला दिलासा
पालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ रस्त्यांवरीलच नव्हे तर विविध प्राधिकरणांकडून जप्त करून वर्षानुवर्षे पडून असलेल्या वाहनांचीदेखील याच माध्यमातून विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे शहरातील मोकळ्या जागा उपलब्ध होण्याबरोबरच वाहतूक व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांना इशारा
महापालिकेने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, रस्त्यांच्या कडेला दीर्घकाळ नादुरुस्त अवस्थेत उभी असलेली वाहने संबंधित मालकांनी स्वतः हटवावीत. अन्यथा पालिका ती वाहने उचलून नेऊन त्यांचा लिलाव करणार आहे.
काय असेल प्रक्रिया?
वाहनांचे नंबर, इंजिन व चेसिस क्रमांकावरून मालकांचा शोध
आरटीओकडून वाहनमालकांची माहिती संकलित
वाहन मालकांना दोन वेळा नोटीस
प्रतिसाद न मिळाल्यास वाहनांचा लिलाव
लिलावातून मिळणाऱ्या रकमेतील हिस्सा पालिका, वाहनमालक आणि एजन्सीकडे जाणार
००००००
