नगरसेवक राहुल कोट यांच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीची मोठी कारवाई; २८० रूम्स, ६० जोते जमीनदोस्त
कल्याण : बल्याणी परिसरातील अनधिकृत चाळींबाबत स्थानिक नगरसेवक राहुल कोट यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर केडीएमसी प्रशासनाला मोठी कारवाई करावी लागली. शुक्रवारी केडीएमसीच्या ‘अ’ प्रभागातील खजुरी नगर, बल्याणी परिसरात धडक मोहीम राबवत तब्बल २८० रूम्स आणि ६० जोत्यांवर बुलडोझर चालवत ती जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे, ‘अ’ प्रभागाचे सहायक आयुक्त जयवंत चौधरी, ‘ड’ प्रभागाचे उमेश यमगर, ‘क’ प्रभागाचे धनंजय थोरात, ‘फ’ प्रभागाचे प्रसाद ठाकूर तसेच ‘ग’ प्रभागाचे जयराम शिंदे यांच्यासह मोठा अधिकारी वर्ग आणि पोलीस बंदोबस्त या मोहिमेत सहभागी होता. एक पोकलेन आणि चार जेसीबीच्या सहाय्याने सकाळपासून सुरू असलेली कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू होती.
विशेष म्हणजे, बल्याणी परिसरातील बेकायदा चाळींमुळे गुन्हेगारी आणि अनधिकृत वास्तव्यास खतपाणी मिळत असल्याचा गंभीर आरोप करत नगरसेवक राहुल कोट यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच आयुक्तांना निवेदन देत बेकायदा बांधकामे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत पालिकेने मोठी कारवाई केल्याने राहुल कोट यांच्या मागणीला काही अंशी यश मिळाल्याची चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे.
दरम्यान, कारवाईदरम्यान काही ठिकाणी नव्याने बांधलेल्या खोल्यांमध्ये नागरिक तात्पुरते वास्तव्यास असल्याचे चित्र दिसून आले. मात्र, प्रशासनाने कोणताही दबाव न घेता सर्व बांधकामांवर हातोडा चालवला. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
