पती पोलिसांच्या ताब्यात
कल्याण : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्याणी येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अमानुष मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून सुरू झालेला वाद काही क्षणांत रक्तरंजित हत्येत बदलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश काळुराम वाघे उर्फ गुड्डू (वय २१) याला पत्नी सारिका उर्फ रुक्सार हिच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. शनिवारी पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात सतीश याने घरातील टीव्ही उचलून पत्नीच्या डोक्यात मारला. त्यानंतरही तो थांबला नाही. घरातील हंड्याने तिच्या डोक्यावर वारंवार प्रहार करत तिला गंभीर जखमी केले.
या क्रूर मारहाणीत सारिका उर्फ रुक्सार हिचा जागीच मृत्यू झाला. घरातून आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. संशयाच्या विळख्यात अडकलेल्या संसाराचा असा भीषण अंत झाल्याने बल्याणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *