– महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
३ सुवर्णपदके तर एका ब्रॉंझ पदकाची कमाई”
मुंबई येथील वरळीच्या  विलिंग्टन जिमखाना  येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा उल्लेखनीय आणि दिमाखदार कामगिरी करत ३ सुवर्ण पदके आणि १ कांस्य पदकाची कमाई केली. राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने पदकांची कमाई करत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीने महाराष्ट्रातील अग्रगण्य बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र म्हणून आपला ठसा अधिक अधोरेखित केला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत सराव करणाऱ्या खेळाडूंनी ही यशस्वी कामगिरी नोंदवली. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर घाटणेकर,  अक्षय देवलकर,  मितेश हाजीरनीस,  राजीव गणपुळे,  एकेंद्र दर्जी,  प्रसेनजीत शिरोडकर आणि  देवांग दलाल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळाडू सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आहेत.
१९ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात सानिध्य एकाडे याने शानदार खेळ करत सुवर्ण पदक पटकावले. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यापूर्वी सानिध्य आणि त्याच्या जोडीदाराने उदयान साळुंखे व सारा साळुंखे यांचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत सर्थक नलावडे व दितीशा सोमकुवर यांच्या विरोधात रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात २१-१४, २०-२२, २१-१८ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत ओजस जोशी व तन्वी घरपुरे यांच्या विरोधात पहिला गेम गमावल्यानंतर सानिध्यने दमदार पुनरागमन करत १२-२१, २१-१७, २१-१७ असा विजय मिळवला. अंतिम सामन्यात सयरा आणि सयाजी शेलार या जोडीवर २१-१४, २१-११ असा सरळ गेममध्ये विजय मिळवत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली.
१९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात प्रथम मानांकित आर्यन बिराजदार आणि अर्जुन बिराजदार या जोडीने संपूर्ण स्पर्धेत अक्षरशः वर्चस्व गाजवत सुवर्ण पदक पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी आदित्य पुजारी व प्रसन्न मन्ना यांचा २१-१०, २१-१६ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत अभिक शर्मा व स्वरित सातपुते या जोडीवर २१-१२, २१-१३ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात आयुष अडे आणि तनय मेहेंदळे यांच्या विरोधातही त्यांनी आक्रमक आणि नियंत्रित खेळाचे प्रदर्शन करत २१-१२, २१-१४ असा दिमाखदार विजय मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली. तर अपूर्व दवाडते याने मिश्र दुहेरी गटात कांस्य पदकाची कमाई करत अकॅडमीच्या पदकतालिकेत आणखी भर घातली.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असून, ठाणे शहराच्या क्रीडा क्षेत्राचा लौकिक उंचावत आहेत. खेळाडूंमधील शिस्त, मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन यामुळे अकॅडमी महाराष्ट्रातील यशस्वी बॅडमिंटन केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे. या स्पर्धेच्या यशामुळे सदर वर्षाच्या बॅडमिंटन खेळाच्या हंगामाची दणदणीत सुरुवात झाली आहे आणि या पुढील हंगामात केवळ राज्य नव्हे तर राष्ट्रीय  स्तरावर देखील ठाणे शहराचे नाव आपण मोठे करू असा विश्वास खेळाडूंनी व्यक्त केला आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी समाधान व्यक्त करत आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त  मीनल पलांडे यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *