आरोग्य, एसटी, शिक्षणाच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची ग्वाही
राजीव चंदने
मुरबाड : “जनतेचे प्रश्न हीच माझी प्राथमिकता” या भूमिकेची प्रचिती देत भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा शनिवारी थेट मुरबाडकरांच्या भेटीला पोहोचले. शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या तसेच त्या सोडवण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

मुरबाड तालुक्यातील आरोग्य सुविधांचा अभाव, ग्रामीण भागातील एसटी फेऱ्यांची अनियमितता, शाळांची दुरवस्था तसेच अनेक विकासकामे रखडल्याबाबत नागरिकांनी निवेदन सादर करत खासदारांचे लक्ष वेधले. विशेषतः ग्रामीण रुग्णालयांतील रिक्त पदे, दुर्गम भागातील वाहतूक व्यवस्था आणि शैक्षणिक सुविधांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी खासदार सुरेश म्हात्रे म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून प्रत्येक प्रश्न मार्गी लावला जाईल.”

ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार असून, येत्या आठ दिवसांत एसटी आगार व्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन ग्रामीण भागातील फेऱ्या वाढवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी मुरबाडकरांना दिली.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक म्हणाले, “खासदार बाळ्यामामांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील.” या जनता दरबाराला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदने स्वीकारतानाच खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दूरध्वनी करून कार्यवाहीच्या सूचना दिल्या, हे विशेष ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *