मुकुंद रांजाणे
माथेरान :एखादे काम हाती घेतल्यावर त्याचा संपूर्ण निपटारा होईपर्यंत प्रयत्न करून गावाला अभिप्रेत असणाऱ्या महत्वपूर्ण कामाला तडीस नेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरींनी अनेक दिवसांपासून पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे पाणी प्रश्नांची उकल करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ऐन सुट्टयांच्या हंगामात पाण्याची समस्या उद्भवली होती ती अखेरीस मार्गी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे सहज शक्य झाले आहे. त्यांच्यासोबत उप नगराध्यक्ष संतोष शेलार सुध्दा वेळोवेळी हजर राहून जातीने लक्ष देत होते.आजवर नेरळ माथेरानला पाणी पुरवठा करणाऱ्या या योजनेच्या अधिकारी वर्गाने पाण्याच्या जुन्या पंपांकडे दुर्लक्ष केल्यामुळे याठिकाणी अनियमित पाणी पुरवठा होत असे.तर या पाण्याच्या पाईप मधून सर्रासपणे पाण्याची चोरी करणाऱ्या लोकांकडे देखील दुर्लक्ष करीत असल्याने माथेरानला अनियमित पाणी पुरवठा व्हायचा. मागील चार महिने तर हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता.त्यामुळे शारलोट तलावातून पाण्याचा उपसा केला जात होता. उल्हास नदीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली होती परंतु सदर बाब स्थानिकांनी गांभीर्याने घेतली नाही. त्याचवेळी माथेरान करांनी लक्ष दिले असते तर एवढा खटाटोप करण्याची वेळ आली नसती असेही बोलले जात आहे.
दरम्यान  महाराष्ट्र सोमवारी जीवन प्राधिकरणाच्या पनवेल येथील कार्यालयात नगराध्यक्ष चौधरी आणि शेलार यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन पिंपरी चिंचवड येथून नवीन पंप खरेदी करून संबंधित ठेका असलेल्या कल्पतरू या कंपनीच्या माध्यमातून नवीन पंप माथेरान नियोजित पाणीपुरवठ्यासाठी वॉटरपाईप पंपिंग हाऊस येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर पंप रात्री ११वाजता स्वतः नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या देखरेखी खाली वॉटर पाईप येथील पंपिंग हाऊस येथे युद्ध पातळीवर बसवण्यात आला आहे.त्यामुळे मंगळवार पासून माथेरानकरांना पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला आहे. मागील काही दिवसांपासून गेले दोन-तीन आठवडे पाण्यासंदर्भात चाललेल्या समाजमाध्यमांवरील  चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उप नगराध्यक्ष संतोष शेलार यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *