जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ९१ टक्के मॅपिंग पूर्ण…!
सिंधुदुर्ग : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिम (एसआयआर -२०२६) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांच्या डिजिटल मॅपिंग प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि निवडणूक यंत्रणेच्या समन्वयाने सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. विशेष पुनःरीक्षण  मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग  प्रशासन सुसज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  धोडमिसे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मतदार मॅपिंगची सुरुवातीची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः या मोहिमेचा आढावा घेत विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथ पातळी अधिकारी (बीएलओ) यांच्या स्वतंत्र बैठका घेत कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले. या बैठकीत तांत्रिक अडचणींचे निराकरण, माहिती संकलनातील त्रुटी दूर करणे आणि मॅपिंग प्रक्रियेत अचूकता राखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि योग्य नियोजनामुळे अल्पावधीतच जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मतदाराचे नाव विद्यमान मतदार यादीतून सन २००२ मधील मतदार यादीशी जोडण्याचे कार्य करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे मतदार नोंदींची खातरजमा होण्यास मदत होणार असून मतदार यादी अधिक स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक बनणार आहे.
निवडणूक विभागाच्या समन्वयातून संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात काटेकोर नियंत्रण ठेवत मोहिमेला गती दिली. तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून बीएलओंकडून हे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *