एक हात मदतीचा’ संस्थेची उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडे मागणी
सुनिल इंगळे
उल्हासनगर : यंदा पहिल्यांदाच मालमत्ता कर पावती वाटपाचे काम उल्हासनगर महानगरपालिकेने कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले असून या कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात यावा अशी मागणी ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक संस्थेने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष विजय कदम, उपाध्यक्ष रवी वलेचा, सचिव अतुल शिंदे, उपसचिव करण दराडे, खजिनदार जयेश बेलदार व सल्लागार दत्तात्रय कदम यांच्या स्वाक्षरीने आयुक्तांना हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी मालमत्ता कर पावती वाटपाचे काम महिला बचत गटांमार्फत केले जाते व त्यांना त्याचा मोबदला दिला जातो. परंतु यावर्षी हे काम महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचारी हे काम चोखपणे व योग्य प्रकारे करत आहेत. मात्र, हे काम करताना कर्मचाऱ्यांना गाडी भाडे, पाणी, जेवण यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने शारीरिक त्रासही होत आहे. तरीही कर्मचाऱ्यांनी कोणतीही तक्रार किंवा अपेक्षा व्यक्त केलेली नाही.
‘आपली महानगरपालिका एक कुटुंब आहे आणि आपण या कुटुंबाचे प्रमुख आहात. त्यामुळे याचा सकारात्मक विचार करून मालमत्ता कर भरणा पावती वाटपासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्वखुशीने काहीतरी विशेष भत्ता देण्यात यावा अशी विनंती ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक संस्थेने केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या अतिरिक्त कामाची दखल घेऊन त्यांना योग्य मोबदला मिळावा जेणेकरून त्यांचे मनोबल वाढेल अशी अपेक्षा देखील ‘एक हात मदतीचा’ संस्थेने व्यक्त केली आहे.
