पेट्रोल -डिझेल -गॅस दरवाढीविरुद्ध
सिंधुदुर्ग: पेट्रोल – डिझेल-गॅस दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘रद्द करा, रद्द करा, पेट्रोल- डिझेल -गॅस दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा देत, हातात रिकामे ‘कॅन’ घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ही निदर्शने करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या निदर्शनात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस साई चव्हाण,जिल्ह्याचे उपाध्यक्ष मेघनाद धुरी,विद्याप्रसाद बांदेकर,व्ही. के. सावंत,मालवण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, प्रदीप मांजरेकर जिल्हा सेवा दल अध्यक्ष अजिंक्य गावडे, किरण टेंबुलकर आदींनी सहभाग घेतला.
जिल्ह्यात जमावबंदी लागू असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपात मोजकेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गेल्या अकरा दिवसात पेट्रोल व डिझेलच्या किंमती आठ रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आल्या असल्याने सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. ही दरवाढ जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे अशी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीच्या कामांना सुरुवात झाली असून जिल्ह्यात ‘पॉवर टिलर’ आणि ‘ट्रॅक्टर’च्या सहाय्याने शेती केली जाते मात्र डिझेलची झालेली दरवाढ आणि भासणारा तुटवडा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा, कोणतीही बाधा न येता सुरळीत रहावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
त्यानंतर जिल्हाध्यक्ष मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची भेट घेऊन त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन शासनाला पाठविण्यात येईल असे सुकटे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
000000000
000000
