पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे आयुष्य धोक्यात
राजेंद्र साळसकर
मुंबई : मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडने आता जागतिक स्तरावरही मुंबईची बदनामी केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस (UCLA) यांच्या २०२६ च्या STOP Methane Project अहवालानुसार कांजूरमार्ग लँडफिलला जगातील सर्वाधिक प्रदूषित लँडफिल्समध्ये १२वा क्रमांक मिळाला आहे. दर तासाला तब्बल ४.९ टन मिथेन वायूची गळती होत असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले असून, हे प्रदूषण जवळपास दहा लाख SUV वाहनांच्या प्रदूषणाइतके धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र इतक्या गंभीर परिस्थितीनंतरही मुंबई महापालिका आणि राज्य सरकार केवळ आश्वासनांची धूळफेक करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कांजूर डम्पिंग ग्राऊंड मुळे कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, विक्रोळी परिसरातील लाखो नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकयातना बनले आहे. दुर्गंधी, प्रदूषित हवा, वारंवार लागणाऱ्या आगी व मिथेन वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, त्वचारोग, फुफ्फुसांचे आजार, दमा, ऍलर्जी यांसारख्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सर्वाधिक धोक्यात आले आहे. अनेक नागरिकांचे आयुष्मान कमी होत असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मुंबईतील जवळपास ९० टक्के घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या या कचराभूमीबाबत पालिका प्रशासनाची भूमिका मात्र पूर्णपणे बेजबाबदार असल्याचा आरोप होत आहे. उपाययोजना सुरू आहेत, वृक्षलागवड केली जाईल, पर्यायी जागेचा शोध सुरू आहे अशी केवळ कागदी घोषणा करण्यात येत असताना प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. १८५ लाख मेट्रिक टनांहून अधिक जुना कचरा या परिसरात साचलेला असून, त्यातून होणारे मिथेन उत्सर्जन थांबविण्यासाठी कोणतीही ठोस व प्रभावी कृती करण्यात आलेली नाही.
या गंभीर प्रश्नावर न्यायालयाने देखील अनेकदा महापालिका व राज्य सरकारची कानउघाडणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याबद्दल न्यायालयाने कठोर निरीक्षणे नोंदविली, तरीही प्रशासन जागे झालेले दिसत नाही. पर्यावरण व सार्वजनिक आरोग्य या दोन्ही आघाड्यांवर पालिकेचे अपयश उघड झाले असून, नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबविण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. ईशान्य ंमुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी हा मुद्दा सातत्याने आक्रमकपणे मांडला आहे. पालिका आयुक्तांसोबतच्या बैठका, डीपीडीसी बैठका तसेच दिल्लीतील लोकसभेतही त्यांनी ईशान्य मुंबईतील डम्पिंगमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या गंभीर परिणामांचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून प्रशासनाला धारेवर धरले आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ थांबवा, कांजूर डम्पिंगला पर्याय द्या, अशी ठाम भूमिका त्यांनी सातत्याने घेतली असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला आहे. दरम्यान, देवनार येथे ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून सात मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे पालिकेने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात त्यातून नागरिकांना किती दिलासा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हजारो कोटींचे प्रकल्प जाहीर करूनही प्रदूषण व दुर्गंधी कमी करण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका होत आहे. कांजूर डम्पिंग ग्राऊंड आता केवळ कचराभूमी राहिलेली नसून ती ईशान्य मुंबईतील लाखो नागरिकांच्या आरोग्यावर घोंगावणारे “विषारी संकट” बनले आहे. प्रशासन अजून किती नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणार आणि या प्रश्नावर ठोस निर्णय कधी घेणार, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
000000000
