सरस्वती कन्या, श्री सह्याद्री, ओम युवा संघांची उपांत्य फेरीत धडक
मुंबई : मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन मुंबई खो-खो संघटनेने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे २७ ते ३० मे कालावधीत आयोजन केले आहे. आज खेळवण्यात आलेल्या पुरुष आणि महिला व व्यावासायील गटातील सामान्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या स्पर्धेला शिवाजी पार्क परिसरातील क्रीडा प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सरस्वती कन्या, श्री सह्याद्री, विद्यार्थी, शिर्सेकर महात्मा, श्री समर्थ, सरस्वती स्पो. अ. भि. गोरेगावकर, महात्मा गांधी, ओम युवा यांनी उपांत्य फेरीत धडक दिली.
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात सरस्वती कन्या संघाने ओम युवा स्पोर्ट्स क्लबचा १२-२ (मध्यंतर १२-१०) असा १ डाव व २ गुणांनी धुव्वा उडवत पराभव केला. या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या जानवी लोंढे (६, १.३० मि. संरक्षण व ८ गुण), सेजल यादव (१.१० नाबाद, २.१० मि. संरक्षण), खुशबू सुतार (१.५० मि. संरक्षण व २ गुण) व वैधवी बटावले व काजल दिवेकर (प्रत्येकी १.४० मि. संरक्षण) यांनी दमदार विजय मिळवून दिला. तर पराभूत ओम युवाच्या अंजू इंगळे (१.२० मि. संरक्षण व २ गुण), शिवानी घाग, चेतना बिक (प्रत्येकी १.३० मि. संरक्षण व १ गुण), आर्या तळेकर (३ गुण) यांनी दिलेली लढत वाया गेली.
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात श्री सह्याद्री संघाने ॐ साईश्वर सेवा मंडळाचा ८-६ (मध्यंतर ८-४) असा १ डाव व २ गुणांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात श्री सह्याद्री संघाच्या आर्या भटकर (नाबाद ४, १.३०मि. संरक्षण) तन्वी थेराडे (२.४०, ३.१० व ४ गुण) ग्रीष्मा माईन (२.१०, १.५० व २ गुण) वैदेही कुंभार (२.२०मि. संरक्षण) या सामन्यात ॐ साईश्वरच्या वैष्णवी परब (४ मि. संरक्षण व २ गुण), दिक्षिता कानेरकर (१.३० मि. संरक्षण ), रिया कदम, प्रांजल पाठक (प्रत्येकी १ मि. संरक्षण) यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.
पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने प्रबोधन क्रीडा भवनवर १७-१२ (मध्यंतर ९-६) असा ५ गुणांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात विद्यार्थीच्या जनार्दन सावंत (२.३०, २.५० मि. संरक्षण व ३ गुण), प्रतीक घाणेकर (१.५०, १.५० मि. संरक्षण), शुभम शिंदे (१.४०, १.४० मि. संरक्षण व १ गुण) व सम्यक जाधव (१.३० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी संघाला विजयाची दारे उघडून दिली तर पराभूत प्रबोधनच्या हर्ष मोरे (१.४०, १ मि. संरक्षण व १ गुण), शांताराम परब (१.१०, २ मि. संरक्षण १गुण) व हर्षल मेहेर (१.४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दिलेली कडवी झुंज संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरचा १३-११ (मध्यंतर १३-६ गुण) असा १ डाव व २ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात शिर्सेकर महात्माच्या धीरज भावे (२.३०, १.३० मि. संरक्षण), अनिकेत पोटे (२ मि. संरक्षण व २ गुण), सुजल जयगडे (१.१०, ३ मि. संरक्षण) प्रतीक देव्हारे, गणेश झोरे (प्रत्येकी २ गुण) यांनी संघाला जोरदार विजयाची नोंद केली. तर पराभूत ॐ समर्थच्या स्वयंम साळवी (१.१० मि. संरक्षण व १ गुण ), प्रथम चौगुले (२.५० मि. संरक्षण व २ गुण) श्रेयस सौंदाळकर (१ मि. संरक्षण) सनी तांबे (३ गुण) यांनी पराभवातही चांगला खेळ केला.
पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यांचे संक्षिप्त निकाल.
श्री समर्थ व्यायाम मंदिर ने वैभव स्पोर्ट्स क्लबचा ९-७ (मध्यंतर ९-३) असा १ डाव व २ गुणांनी विजय मिळवला.
सरस्वती स्पोर्ट्स क्लब ने श्री सह्याद्री संघाचा १५-१४ (मध्यंतर ८-६) असा चुरशीच्या सामन्यात १ गुणाने पराभव केला.
महिला गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यांचा संक्षिप्त निकाल
अ. भि. गोरेगावकर या संघाने शिवनेरी सेवा मंडळावर १०-७ (मध्यंतर १०-३) असा १ डाव ३ गुणांनी धमाकेदार विजय मिळवला
शिर्सेकर महात्मा गांधीने अमर हिंद मंडळाचा १५-६ (मध्यंतर १५-२) असा १ डाव व ९ गुणांनी दणक्यात पराभव केला.
ओम युवा स्पोर्ट्स क्लबने श्री समर्थ व्यायाम मंदिरावर १२-११ (मध्यंतर १०-४) असा १ गुण व ६ मिनिटे राखून मोठा विजय मिळवला.
0000000000
