मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
(अशोक गायकवाड
मुंबई -जुहू येथील सरकारी जागेवरील अतिक्रमणावर शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे ७० अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे निष्कासित करण्यात आली. यामध्ये अंदाजे ८ हजार चौ. फूट शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. ही कारवाई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच अपर जिल्हाधिकारी(अतिक्रमण/निष्कासन) पश्चिम उपनगर गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), बांद्रा वैशाली परदेशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कारवाईत महानगरपालिका व पोलीस विभागाचे अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईमुळे शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त होऊन ती शासनाच्या ताब्यात आली आहे. लवकरच या जमिनीस संरक्षण भिंत बांधली जाणार आहे.
