:
अजितदादा नंतर अहिल्यादेवींचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभ – सुनेत्रा पवार
मुंबई : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपस्थित राहून अभिवादन केले.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, स्वराज्यजननी जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. “आदरणीय अजितदादांनंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरत आहे,” असे त्यांनी सांगितले.
अहिल्यादेवींनी २८ वर्षांच्या राज्यकारभारात सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. न्यायव्यवस्था बळकट करण्याबरोबरच त्यांनी लोककल्याणकारी कामांसाठी स्वतःच्या संपत्तीचा वापर केला. महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासक होत्या, असेही पवार यांनी नमूद केले.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’चा तसेच बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवींचे नाव देण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला. चौंडीच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *