प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशसेवेचे स्वप्न साकार; मुरबाड तालुक्यात अभिमानाचे वातावरण
राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील फणसोली गावचा सुपुत्र संविधान रविंद्र चंदने याची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याने गावासह संपूर्ण मुरबाड तालुक्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. संविधान हा रेखा व रविंद्र चंदने यांचा सुपुत्र असून त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शांत, संयमी आणि जिद्दी स्वभावाचा संविधान लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून होता. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने शिक्षण आणि सैन्यभरतीची तयारी यामध्ये सातत्य राखत कठोर परिश्रम घेतले. औरंगाबाद येथील डिफेन्स शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करताना तो कुटुंबापासून दूर राहिला. त्यानंतर कल्याण येथे एनसीसीचे प्रशिक्षण घेत असताना रोजचा कल्याण-मुरबाड प्रवास, वेळेचे काटेकोर नियोजन आणि शारीरिक मेहनत या सर्व आव्हानांचा त्याने खंबीरपणे सामना केला.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी देशसेवेचे स्वप्न कधीही डळमळू दिले नाही,” असे संविधानने सांगितले. आपल्या यशाचे श्रेय तो आई रेखा चंदने यांनी दिलेल्या संस्कारांना तसेच वडील रविंद्र चंदने यांच्या सामाजिक कार्यातून मिळालेल्या प्रेरणेला देतो.
संविधानच्या या यशामुळे फणसोली गावासह संपूर्ण मुरबाड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून युवकांसाठी तो प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येते, हे संविधान चंदने याने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *