ठाणे, प्रतिनिधी : सन २०२६-२७ च्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत तूर पिकासाठी प्रमाणित बियाणे वितरण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी कमाल एक हेक्टर क्षेत्रासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे Agristack Farmer ID असणे बंधनकारक असून त्यांनी विहित मुदतीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. बियाण्यांचे वितरण संबंधित पुरवठादार संस्थांच्या वितरकांमार्फत ७/१२ उताऱ्याच्या आधारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) तत्त्वावर करण्यात येणार आहे.
योजनेत अधिसूचित झाल्यानंतर तीन वर्षांनंतरच्या पुढील पाच वर्षांच्या कालावधीत असलेले वाण अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. तूर प्रमाणित बियाण्यासाठी पाच वर्षांपर्यंतच्या वाणांना प्रति क्विंटल ६,००० रुपये तर पाच ते दहा वर्षांदरम्यानच्या वाणांना प्रति क्विंटल ३,००० रुपये शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
वितरकांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागावर कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत अनुदानित बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देणारा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बियाण्यांचे वाणनिहाय दर, अनुदानाची रक्कम आणि अनुदान वजा केल्यानंतरची प्रत्यक्ष किंमत याची माहितीही फलकावर प्रदर्शित करावी लागणार आहे.
लाभार्थी निवडीत अनुसूचित जातींसाठी १२ टक्के, अनुसूचित जमातींसाठी ९ टक्के आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७९ टक्के प्राधान्य राखण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यास या अभियानांतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरणासाठी २० क्विंटल बियाणे व ०.९० लाख रुपयांचा आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *