सीसीटीव्हीत दुचाकीवर आलेले जोडपे कैद
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात कचऱ्याचे मोठे डबे चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. मोठ्या सोसायट्या आणि इमारतींकडून ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी चाक असलेले विशेष डबे ठेवण्यात आले आहेत. मात्र हेच डबे आता चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहेत. एक डबा चोरी करताना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला आहे.
या कचरा डब्यांची बाजारातील किंमत अंदाजे तीन हजार रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. घंटागाडी आल्यानंतर कमी वेळेत आणि सहज कचरा टाकता यावा यासाठी हे डबे वापरले जातात. मात्र काही जण हे डबे चोरी करून भंगारात किंवा सेकंडहॅण्ड स्वरूपात विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील सिमेन्स सोसायटीसमोर ठेवलेले कचऱ्याचे डबे दुचाकीवरून आलेल्या एका जोडप्याने चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
00000000
