सुरक्षेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह
कल्याण: टिटवाळा येथील दळवीवाडाजवळील अमृतसिद्धी रोड आणि सुमुख सोसायटी परिसरातील रस्त्यावरील क्रॉस गटाराची सफाई करताना सफाई कर्मचाऱ्यांना थेट गटारात उतरून मैला काढावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही कर्मचाऱ्यांना स्वतः गटारात उतरून सफाई करावी लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हाताने मैला काढणे आणि नाल्यांची सफाई करणे यावर कायद्याने बंदी असतानाही अशा घटना घडत असल्याने संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जोशी यांनी हा व्हिडिओ संबंधित प्रशासन आणि महापालिका आयुक्तांकडे पाठविणार असल्याचे सांगितले असून, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यांत्रिक पद्धतीने गटार सफाई, आवश्यक सुरक्षा साधने आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0000000000
