आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : राज्य सरकारने वैद्यकीय परिषदेमधील सदस्यांची निवडणूक पध्दत रद्द करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा व पुर्वीप्रमाणे महाराष्ट्र वैद्यकीय निवडणूक पध्दत कायम ठेवण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी एका पत्राद्वारे केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या मुंबई शाखेच्या वतीने शिवसेना नेते आणि दिंडोशीचे  आमदार सुनील प्रभू यांना लेखी पत्र दिले आहे. या पत्रात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही सुमारे १८ लाखाहून अधिक डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणारी वैधानिक स्वायत्त व नियामक संस्था असून सध्याची निवडणूक पद्धत ही लोकशाही तत्त्वांवर आधारित आहे व ती पारदर्शकता उत्तरदायित्व व वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग सुनिश्चित करते. नाम निर्देशन पद्धती लागू केल्यास परिषदेचे प्रतिनिधी स्वरूप लायाला जाईल. वैद्यकीय समुदायात प्रती उत्तरदायित्व घटेल. परिषदेची स्वायत्तता व निष्पक्षता बाधित होऊ शकते. निर्णय प्रक्रिये बाबत शंका व अविश्वास निर्माण होऊ शकतो. इंडियन मेडिकल असोसिएशन ही आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना असून व्यावसायिक स्वनियमानासाठी लोकशाही पद्धत अत्यंत आवश्यक असल्याचे आम्ही मानतो असे लिहीत शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांना विनंती करीत वैद्यकीय क्षेत्रातील या गंभीर चिंतेची दखल घ्यावी असे सांगितले. दरम्यान या सर्व बाबींची दखल घेत शिवसेना नेते, दिंडोशीचे शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परिषदेची स्वायत्तता कायम ठेवण्यासाठी आपण सकारात्मक हस्तक्षेप करून मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबाबत पुनर्विचार करून अधिनियमात बदल करावा अशी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *