तातडीच्या कारवाईची मनसेची मागणी
कल्याण : राज्याच्या महत्त्वाकांक्षी आणि अतिवेगवान वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते आसनगाव तसेच निंबवली टोल प्लाझा परिसरामध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर ट्रक, ट्रेलर, कंटेनर आणि इतर अवजड वाहने अनधिकृतरित्या रस्त्याच्या कडेला व वाहतूक लेनमध्ये उभी केली जात असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित विभागाकडे तक्रार वजा निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे तक्रार वजा निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख उल्हास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना उपाध्यक्ष ॲड. अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके तसेच रोहित जोशी उपस्थित होते. मनसेच्या निवेदनानुसार, समृद्धी महामार्ग हा अतिवेगवान वाहतुकीसाठी विकसित करण्यात आला असून दररोज हजारो नागरिक, खासगी वाहने, प्रवासी बस तसेच मालवाहतूक करणारी अवजड वाहने या मार्गाचा वापर करतात. मात्र इगतपुरी ते आसनगाव या दरम्यान आणि विशेषतः निंबवली टोल प्लाझा परिसरात अनेक किलोमीटरपर्यंत ट्रक व कंटेनरच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दोन ते तीन लेनपर्यंत ही वाहने उभी असल्याने प्रत्यक्ष वाहतुकीसाठी केवळ एकच लेन उपलब्ध राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.
रात्रीच्या वेळी कमी दृश्यमानता, पावसाळी वातावरण, धुके अथवा वाहनांचा वेग लक्षात घेता अशा प्रकारे उभी असलेली वाहने चालकांच्या लक्षात वेळेत न आल्यास भीषण अपघात घडू शकतो. विशेषतः मागून येणाऱ्या वाहनांना अचानक लेन बदलावी लागत असल्याने साखळी अपघात, वाहनांचे नियंत्रण सुटणे तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येबाबत पोलिस प्रशासन तसेच निंबवली टोल नाक्यावरील अधिकारी सातत्याने रस्ते विकास महामंडळ व संबंधित महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार करीत आहेत. विविध माध्यमांतून या प्रश्नाची दखल घेण्याची विनंती करण्यात आली असून परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. मात्र, संबंधित प्राधिकरणाकडून या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
याप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग असला तरी त्यावरील सुरक्षा धोक्यात येऊ देणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
00000000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *