डोंबिवली, २१ जून : फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने उल्हासनगर येथे नवीन फोर्टिस मेडिकल सेंटर सुरू करून परिसरातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा अधिक सुलभ केली आहे. या केंद्रामुळे उल्हासनगर आणि आसपासच्या भागातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या बाह्यरुग्ण (ओपीडी) सेवा आता त्यांच्या परिसरातच उपलब्ध होणार आहेत. या केंद्राचे उद्घाटन बाबा साई कालिराम साहेबजी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. एस. नारायणी, बिझनेस हेड – फोर्टिस हॉस्पिटल्स महाराष्ट्र, डॉ. विशाल बेरी, फॅसिलिटी डायरेक्टर – फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड तसेच फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड आणि कल्याण येथील वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.
उल्हासनगरमधील हे मेडिकल सेंटर धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले असून ते बहुविशेषज्ञ बाह्यरुग्ण केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे. येथे विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच सहा खाटांचे स्वतंत्र डायलिसिस युनिट उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे नियमित मूत्रपिंड उपचार घेणाऱ्या आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे केंद्र फोर्टिस हेल्थकेअरच्या एकात्मिक वैद्यकीय नेटवर्कशी जोडलेले असल्याने रुग्णांना विविध तज्ज्ञ शाखांमधील समन्वित उपचारांचा लाभ मिळणार आहे. तसेच गरज भासल्यास रुग्णांना फोर्टिस हॉस्पिटल कल्याण आणि मुलुंड येथे प्रगत उपचारांसाठी सहजपणे हलविण्याची सुविधाही उपलब्ध असेल. भविष्यात येथे ऑन्कोलॉजी डे-केअर अर्थात केमोथेरपी सेवा सुरू करण्याची योजना असून त्यामुळे कर्करोग रुग्णांनाही स्थानिक पातळीवर उपचार मिळणे शक्य होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बाबा साई कालिराम साहेबजी यांनी उत्तम आरोग्य हा आनंदी आणि प्रगत समाजाचा पाया असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्ण आणि नियमित उपचारांची गरज असलेल्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत उल्हासनगरमध्ये सुरू झालेले हे मेडिकल सेंटर नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांचा प्रवासाचा ताण कमी करण्यास मदत करेल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. एस. नारायणी यांनी सांगितले की, शहरभर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या फोर्टिसच्या वचनबद्धतेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. बदलत्या आरोग्य गरजांच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि सर्वसमावेशक उपचार नागरिकांच्या जवळ पोहोचविणे आवश्यक आहे. आगामी काळात ऑन्कोलॉजी डे-केअर सेवा सुरू करून या प्रदेशातील वाढत्या आरोग्य गरजांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उल्हासनगरमधील नवीन मेडिकल सेंटरची स्थापना ही फोर्टिस हेल्थकेअरच्या महानगरांपलीकडे जाऊन आरोग्यसेवा विस्तार करण्याच्या धोरणाचा भाग असून, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन आणि बहुविशेषज्ञ उपचार नागरिकांच्या घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
