अनिल ठाणेकर
ठाणे: दलित पँथर सेनेचे अध्यक्ष बुधभूषण गोटे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
युवा दलित नेते म्हणून बुद्धभूषण गोटे यांची महाराष्ट्रात ओळख आहे. मुंब्रा येथील दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते दिवंगत कुंदन गोटे यांचे ते सुपुत्र आहेत. दलित चळवळीत सक्रीय असलेले बुद्धभूषण गोटे यांचा मराठवाडा, विदर्भामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. गोटे यांच्यावर संघटनेची मोठी जबाबदारी देण्यात येणार असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षसंघटना मजबूत होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
शरद पवार, डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या पुरोगामी विचारधारेवर विश्वास ठेवून आपण पक्षात प्रवेश केला आहे. आंबेडकरी समुदायाला न्याय देण्याची क्षमता शरद पवार आणि डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये असल्यानेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत असल्याचे बुद्धभूषण गोटे यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड व अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *