दोन दिवसांच्या आंदोलनानंतर शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालये पूर्ववत
कल्याण: डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीनंतर सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे याला अटक झाल्यानंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन दिवसांपासून बंद असलेल्या शास्त्रीनगर आणि कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीनंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडत सेवा बंद ठेवल्या होत्या. मात्र मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दोन दिवसांपासून बंद असलेली शास्त्रीनगर आणि कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयाची ओपीडी तसेच नियमित आरोग्य सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. पहाटेपासूनच दोन्ही रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून उपचार सेवा पूर्ववत झाल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून रमेश म्हात्रेसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटकेनंतर प्रकृती अस्वस्थ झाल्याने रमेश म्हात्रे यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयाला भेट देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, रुग्णालयातील सेवा सुरू झाल्या असल्या तरी शास्त्रीनगर रुग्णालय परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त आणि अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
०००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *