रमेश म्हात्रे यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये १८ गुन्हे दाखल
कल्याण : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण केवळ एका रागाचा उद्रेक नव्हता, तर या प्रकरणातील आरोपींची पार्श्वभूमी पाहिल्यास ही एक सराईत गुन्हेगारी वृत्ती असल्याचे समोर येत आहे. रुग्णालयात घुसून डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांच्या गुन्हेगारी कुंडलीमुळे आता शहरात मोठी खळबळ उडाली आहे. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जेव्हा कायद्याचा सन्मान करण्याऐवजी गुन्हेगारी मार्गाने आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी धक्कादायक असून, त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
डोंबिवलीतील या मारहाण प्रकरणात अटकेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कल्याण-डोंबिवलीसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत. केवळ सामान्य नागरिकच नाही, तर राजकीय नेत्यांनाही धमकावण्यापासून ते सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. रमेश म्हात्रे यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारामारी आणि धमकी देणे अशा विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
त्यांच्या गुन्हेगारी इतिहासातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे २००५ मध्ये तत्कालीन शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय तत्कालीन स्थायी समिती सभापती राहुल दामले यांना जीवे मारण्याची धमकी देणे आणि तत्कालीन पालिका आयुक्त वेलारासू यांना धमकावणे अशा घटनांमुळे म्हात्रे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. महापालिका सभागृहात दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांच्यात झालेला वाद आणि त्यानंतर झालेली धक्काबुक्की हे देखील त्यांच्या आक्रमक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदाहरण मानले जाते.
रमेश म्हात्रे यांच्यासोबत या मारहाण प्रकरणात जे इतर तीन आरोपी अटक झाले आहेत, त्यांची पार्श्वभूमीही तितकीच गंभीर आहे. या टोळीतील प्रत्येक सदस्य गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. अक्षय करांडे याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचे २ गंभीर गुन्हे दाखल आहेत, याशिवाय त्याच्यावर मारामारीचे इतरही काही गुन्हे नोंद आहेत. प्रमोद निकम याच्यावर सातारा जिल्ह्यात खुनाचा म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. तर रमेश पवार याच्यावर महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.
अशा प्रकारे एका नगरसेवकासोबत इतक्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक एकत्र असल्याचे पाहून सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
