वालधुनी पुलावरील अवजड वाहन प्रतिबंधक बॅरिकेडला टेम्पोची धडक
संपूर्ण बॅरिकेड कोसळले
कल्याण : कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या वालधुनी पुलावर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेडला शुक्रवारी सकाळी सुमारे ८ च्या दरम्यान एका दुध वाहतूक करणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने संपूर्ण बॅरिकेड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झालेले नाही.
घटनेनंतर काही काळ पुलावरील वाहतुकीवर परिणाम झाला. बॅरिकेड कोसळल्यामुळे अवजड वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली व्यवस्था निष्प्रभ झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. दरम्यान, ही घटना सकाळच्या वर्दळीच्या वेळेत घडल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. पुलावरील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच बॅरिकेडची मजबुती आणि नियमित देखभाल करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
