दिवा :- ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाई कामांमध्ये झालेल्या दिगंराई आणि गंभीर त्रुटींबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संपूर्ण ठाणे शहरातील विविध प्रभागांतील ठेकेदारांवर सुमारे ₹२८.36 लाखांचा दंड आकारण्यात आला असून, त्यामध्ये दिवा विभागातील ठेकेदारावर तब्बल ₹७.३५ लाखांचा सर्वाधिक दंड आकारण्यात आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून दिवा विभागातील प्रशासनाचे अपयश आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचे ज्वलंत उदाहरण आहे.
दिवा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना नाल्यांच्या अपुऱ्या सफाईमुळे रस्त्यांवर पाणी तुंबणे, घरांमध्ये पाणी शिरणे, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही प्रत्यक्षात कामे अर्धवट आणि निकृष्ट दर्जाची होत असल्याचे या दंडावरून स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली ही स्वागतार्ह बाब असली, तरी केवळ दंड आकारून जबाबदारी संपत नाही. अशा निकृष्ट कामांना जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, अभियंते आणि कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणेवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. दिवा विभागाचा सर्वाधिक दंड हा या भागातील नागरिकांवर झालेल्या अन्यायाचा पुरावा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभारावी, अशी ऍड. मुंडे यांची ठाम मागणी आहे.
दिवा येथील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत राहू आणि आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनही करू असे ॲड. रोहिदास मुंडे उपजिल्हाप्रमुख, कल्याण ग्रामीण विधानसभा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी म्हटले आहे.
000000000
Heading – पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरा
Slug – ठाणे महापालिकेचे नागरिकांना आवाहन
ठाणे : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याद्वारे पसरणाऱ्या जलजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
पावसाळ्यात जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी आपल्या इमारतींमधील जमिनीखालच्या तसेच इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करावी. तसेच पाण्याच्या टाक्यांच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून घरगुती वापरासाठी तसेच पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून व गाळून घ्यावे. यामुळे जलजन्य रोगांचा प्रसार टाळता येईल असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *