अनिल ठाणेकर
ठाणे : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी घोटाळा व लूटप्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यभर सुरू केलेल्या ‘रामरक्षा आंदोलन’ अंतर्गत माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात श्रीराम मंदिरासाठी देशभरातील भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. “प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या जनतेच्या पैशांचा अपहार झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून सत्य जनतेसमोर यावे,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. राजन विचारे यांनी यावेळी सरकारवर टीका करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘रामरक्षा आंदोलन’ विविध ठिकाणी राबविण्यात येत असून, श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
