घरोघरी जाऊन फॉर्म भरणे आवश्यक -नंदकुमार देशमुख
अनिल ठाणेकर
ठाणे, मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेबाबत प्रशासनाने केलेल्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात घरोघरी जाऊन मतदारांचे फॉर्म भरले जात नसल्याचा आरोप ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रेय देशमुख यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदार यादी तयार करण्यासाठी नियुक्त कर्मचारी (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आवश्यक फॉर्म भरून घेतील, असे आवाहन केले होते. मात्र आजपर्यंत कोणताही कर्मचारी घरी आलेला नसल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
शिवाईनगर येथील शाळेत सुमारे ५० नागरिक माहिती घेण्यासाठी गेले असता, तेथे बीएलओंची यादी उपलब्ध झाली. मात्र यादीतील बहुतांश अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने किंवा आवश्यक माहिती न दिल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.अनेक मतदारांना ऑनलाइन पद्धतीने माहिती मिळविणे किंवा अर्ज भरणे शक्य नसल्याने प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे. बीएलओंना आवश्यक सूचना देऊन त्यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदार यादी पडताळणी व फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी नंदकुमार दत्तात्रेय देशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *