मुंबई प्रदेश महिला कार्याध्यक्षपदी पायल खरे
मुंबई : नवी मुंबईतील नेरळ येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाखरे आणि मुंबईतील नायगाव येथील समाजसेविका पायल राजेंद्र खरे यांची अनुक्रमे राष्ट्रीय चर्मकार संघचे नवी मुंबई प्रदेश आणि मुंबई प्रदेशच्या महिला कार्याध्यक्ष म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे.या नवीन नियुक्तीची पत्रे राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी त्यांना माटुंगा लेबर कॅम्प येथे अलिकडेच झालेल्या समाजाच्या मेळाव्यात दिली.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगावकर, कार्याध्यक्ष अशोक देहरे, मुंबई प्रदेशच्या महिला प्रदेशाध्यक्ष शारदा नवले आदी उपस्थित होते. नेरळ येथील संत रोहिदास सेवा फाऊंडेशनचे विनोद पाखरे हे अध्यक्ष असून या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्या,शैक्षणिक साहित्य, छत्र्यांचे वाटप केले जाते. याचबरोबर नेरळमध्ये या संस्थेतर्फे रक्तदान शिबिरे,आरोग्य शिबिरे घेतली जातात. या फाऊंडेशनचे वैशिष्ट्य म्हणजे गरजू, बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार खाजगी व सरकारी नोकरी मिळवून देण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले जाते. अशा प्रयत्नांतून अनेक तरुणांना खाजगी, सरकारी नोकऱ्या मिळून त्यांचे आयुष्य उज्वल झालेले आहे. याचा आपल्याला अभिमान असल्याचे विनोद पाखरे यांनी सांगितले.
विनोद पाखरे पुढे म्हणाले मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चर्मोद्योग कामगार सेनेचा सरचिटणीस आहे. मात्र राष्ट्रीय चर्मकार संघामध्ये आम्ही पक्षीय विषय बाजूला ठेवून चर्मकार समाजासाठी एकदिलाने काम करीत राहणार आहे. एसएनडीटी विद्यापीठाची सामाजिक शास्त्राची एम.एस.डब्ल्यू . ही पदवी घेऊन पायल खरे यांनी काही काळ बँकिंग क्षेत्रात काम केले. परंतु समाजातील गरजू महिला, युवक, वंचित घटकांसाठी काम करण्याच्या उद्देशाने ही नोकरी सोडून २००९ पासून त्यांचा समाजसेवेचा प्रवास सुरू झालेला आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने त्यांनी व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी संभाषण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहे. यानंतर त्यांनी मेणबत्ती कॅण्डल आणि बॅग निर्मिती यासारखे लघु उद्योग सुरू करून अनेक महिलांना रोजगार आणि स्वाभिमानाचे एक दार उघडून दिलेले आहे.
पायल खरे म्हणाल्या महिला सक्षमीकरण, युवक कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, समुपदेशन, आरोग्य जनजागृती आणि आर्थिक मार्गदर्शन या क्षेत्रात सातत्याने मला काम करण्याची संधी मिळालेली आहे.सध्या मी मोटिव्हेशशनल स्पीकर अर्थात एक प्रेरणादायी वक्ता, समूह समुपदेशक,हेल्थ कन्सल्टंट, हेल्थ ॲडव्हायझर आणि फायनान्शियल ॲडव्हायझर म्हणून कार्यरत आहे.तसेच मागील गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्यूअरशिप डेव्हलपमेंट मध्ये (एम.एस.ई.डी.) प्रोग्राम ऑर्गनायझर म्हणून मी काम करीत आहे. आमच्या कार्याची दखल घेऊन माजी आमदार बाबुराव माने यांनी आमची राष्ट्रीय चर्मकार संघाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत.आम्ही आमच्या पदाला चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा समाजाच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे पायल खरे, विनोद पाखरे यांनी म्हटले आहे.
००००
