वारकऱ्यांना आवश्यक साहित्य वाटप
मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या माऊली फाउंडेशन, सानपाडा,ज्ञनवी मुंबई यांनी यंदाही मोठ्या उत्साहात सेवा उपक्रम राबवून हजारो वारकऱ्यांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप केले. वारकऱ्यांच्या गरजा ओळखून सातत्याने सेवा देणाऱ्या फाउंडेशनने गेल्या दोन वर्षांपासून हजारो वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय साधनांच्या संचाचे वाटप करण्याचा उपक्रम यशस्वीपणे सुरू ठेवला आहे.
यावर्षी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, हितचिंतक आणि सेवाभावी नागरिकांनी माऊली फाउंडेशनच्या कार्यावर विश्वास ठेवून उदंड सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे वैद्यकीय साधनांच्या संचासोबतच रेनकोट, पिण्याचे पाणी, बिस्किटे, हल्दिराम उपवास चिवडा, तुळशीची माळ आणि श्रीमद् भगवद्गीता यांचेही मोठ्या प्रमाणावर वाटप केले.
विशेष म्हणजे सेवा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित न ठेवता, वाटप पूर्ण झाल्यानंतर माऊली फाउंडेशनच्या संपूर्ण पथकाने सेवा केंद्र आणि परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता हीसुद्धा सेवा या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी आणि उपस्थित नागरिकांनी विशेष कौतुक केले. माऊली फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सायली कैलास मुद्रास यांनी सांगितले की, वारकऱ्यांची सेवा जितकी महत्त्वाची आहे तितकेच वारीचे पावित्र्य आणि परिसराची स्वच्छता राखणेही प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा जप करत फाऊंडेशन सातत्याने समाजकार्यात योगदान देत आहे. वारकरी संप्रदायाच्या या सेवाभावी कार्यात माऊली फाउंडेशनचे खजिनदार अजय पवार आणि सचिव विकास वाघुले यांचे फार मोठे योगदान आहे. या सेवाकार्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व दाते, स्वयंसेवक, सहकारी आणि समाजातील नागरिकांप्रती माऊली फाउंडेशनने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रत्येक देणगीमागील समाजसेवेची भावना हीच या कार्याची प्रेरणा असून, त्याच बळावर अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत सेवा पोहोचविणे शक्य झाल्याचे फाऊंडेशनने नमूद केले.
पुढील वर्षी हा सेवायज्ञ आणखी व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प माऊली फाऊंडेशनने केला असून आमच्या कार्याची दखल घेऊन कालच एका भक्ताने आम्हाला पुढील वर्षासाठी देणगी दिली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवायज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. दान करणारा हात आणि सेवा करणारा हात, दोन्ही विठ्ठलाचेच रूप आहेत. स्वच्छता ही सुद्धा सेवा आहे. माऊली फाऊंडेशन या दोन्ही मूल्यांचा जप करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
