पंकज उधास यांच्या संगीतसेवेचा आणि समाजकार्यातील वारशाचा जागर
मुंबई : पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित दिवंगत गझल सम्राट पंकज उधास, ज्येष्ठ गायक अनुप जलोटा आणि तलत अजीज यांच्या संकल्पनेतून २००१ साली सुरू झालेल्या ‘खजाना – द फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ या प्रतिष्ठित महोत्सवाने यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात दिमाखदार प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडंटच्या ‘द रीगल रूम’मध्ये शुक्रवारी या दोन दिवसीय महोत्सवाचा सुरेल शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
रौप्यमहोत्सवी पर्वानिमित्त दिवंगत गझल सम्राट पंकज उधास यांच्या समृद्ध संगीतवारशाला तसेच गेल्या २५ वर्षांत ‘खजाना’ला समृद्ध करणाऱ्या दिग्गज कलाकारांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. संगीत, संवेदना आणि समाजसेवा यांचा सुरेल संगम अनुभवण्यासाठी देशभरातील गझलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ गझल गायक अनुप जलोटा, हरिहरन, रेखा भारद्वाज, मिताली सिंह, पेनाझ मसानी, सुदीप बॅनर्जी, पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (PATUT)च्या फरीदा पंकज उधास तसेच कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA)चे वाय. के. सप्रू यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
रौप्यमहोत्सवी ‘खजाना’च्या दोन दिवसांच्या सांगीतिक पर्वात अनुप जलोटा, हरिहरन, सोनू निगम, रेखा भारद्वाज, विशाल भारद्वाज, जावेद अली, सुदीप बॅनर्जी, सुनील मुंगे, अलेना भारती, निहिरा जोशी आणि तेजस गंभीर या नामवंत कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गझल, सूफी आणि भावसंगीताच्या सुरावटींनी सजलेल्या या मैफलींमधून प्रत्येक कलाकाराने दिवंगत पंकज उधास यांच्या संगीतवारशाला भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी फरीदा पंकज उधास म्हणाल्या, “’खजाना’ हा पंकजजींसाठी केवळ संगीत महोत्सव नव्हता, तर तो आशा, संवेदना आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा प्रवास होता. ते आज आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा प्रत्येक सुरातून आजही जिवंत आहे. कलाकार, रसिक आणि समाजाने दिलेल्या प्रेमामुळेच ‘खजाना’चा हा प्रवास आज २५ वर्षांपर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे.”
दिवंगत पंकज उधास यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाने गेली २५ वर्षे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी कार्यरत पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (PATUT) आणि कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचार व मदतीसाठी कार्यरत कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) यांच्यासाठी निधी संकलनाची परंपरा अखंडपणे जपली आहे. संगीताच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देणारा ‘खजाना’ आजही ही परंपरा तितक्याच प्रभावीपणे पुढे नेत आहे.
दोन दिवस चाललेल्या या रौप्यमहोत्सवी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरेल सादरीकरणासह समाजसेवेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवत ‘खजाना – द फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ने आपल्या २५ वर्षांच्या समृद्ध प्रवासाला संस्मरणीय स्वरूपात उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *