प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक संतप्त
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रातील सर्व्हर डाऊन झाल्याने मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना प्रतिक्षा करावी लागली. कर भरण्याची प्रक्रिया ठप्प झाल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. महापालिकेच्या या कारभाराविषयी नागरीकांनी संताप व्यक्त केला.
महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्राता सर्व्हर मंगळवारी अचानक डाऊन झाल्याने कामकाज ठप्प झाले. मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना काउंटरवर तासंतास प्रतीक्षा करावी लागली. ऑनलाइन प्रणाली बंद पडल्याने कर स्वीकारण्याची प्रक्रिया थांबली. अनेक नागरिक रांगेत उभे राहूनही काम न झाल्याने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सर्व्हरची तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र वारंवार होणाऱ्या अशा समस्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया करदात्यांनी व्यक्त केली.
दरम्यान या विभागाचे उपायुक्त विराज लब्दे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सर्व्हर डाऊन का झाला? याची विचारणा संबंधित विभाग प्रमुखाकडे केली आहे. उद्या यासंदर्भात त्यांची बैठक घेणार आहे. आजच्या दिवशी महापालिकेची वेबसाईट सुरु होती. मात्र नागरीकांना बाहेरुन तिचा वापर करता येत नव्हता. महापालिकेची वेबसाईट तयार करण्यावर १३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ही साईट  ऑपरेट करण्याच्या कामावर १३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात एकूण २६ कोटीचा खर्च करण्यात आला आहे. हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे. २६ कोटी रुपये खर्च करुन देखील नागरीकांना सर्व्हर डाऊनचा सामना करावा लागत आहे. देखभाल दुरुस्तीवर किती खर्च केला जातो याचा तपशील समोर आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *