झडपोली (विक्रमगड) | प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेनिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांना हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी भेटून शुभेच्छा दिल्या. झडपोली येथील जिजाऊ नगरीमध्ये दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
जिजाऊ संस्थेमार्फत शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार, शेती विकास आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याने त्याचा लाभ घेतलेल्या अनेक विद्यार्थी व नागरिकांनी यावेळी सांबरे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या जीवनातील प्रेरणास्थान असल्याचे सांगत आशीर्वाद घेतले.
यावेळी विद्यार्थ्यांनी “गुरु केवळ शिक्षण देत नाही, तर आयुष्याला दिशा देतो,” अशी भावना व्यक्त केली. तसेच विविध क्षेत्रांतील शिक्षक, मार्गदर्शक आणि गुरुजनांचा सन्मान करून गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त व्यक्त झालेला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा स्नेह व आदर हा जिजाऊ संस्थेने समाजासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
