उलवे : आज सगळीकडे सायबर चोरांचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच वेळा उच्च शिक्षितही सायबर चोरांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे जनजागृतीची मोहीम उलवे पोलिसांनी हाती घेतली आहे. त्याचा एक भाग म्हणून मंगळवारी उलवे पोलिस ठाण्यातर्फे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गव्हाणमध्ये सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी विभागाचे पीएसआय अनिल राजुरे, दीपक करांडे, अशोक साळवे, हवालदार रोहिणी जाधव आदी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सायबर फ्रॉड हे मोबाईलच्या चुकीच्या वा बेसावध वापरामुळे होतात. साहजिकच फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत आहेत. आपण युपीआयद्वारे पैसे पाठवू शकतो, पण गेलेले पैसे पुन्हा आपल्या खात्यावर माघारी घेऊ शकत नाही, त्यामुळे याचा फायदाही सायबर चोर घेत आहेत, असेही मार्गदर्शन करताना पोलिसांनी सांगितले. यावेळी पीएसआय अनिल राजुरे म्हणाले, “आपण गुगल, यू ट्युब, व्हॉटसअप वा इतर अॅपचा वापर करताना अनावश्यक परवानग्या देतो, तसेच चुकीच्या लिंक ओपन केल्याने आपल्या मोबाईचा ताबा सायबर चोरटे घेतात. त्यामुळे मोबाईलचा वापर अतियश हुशारीने आणि सावधपणे करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपला फोटा मार्फ केला जातो. त्यामुळे आपले फोटो मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अनोळखी माणसाकडून चॉकलेट वा इतर पदार्थ दिल्यास खाऊ नयेत. कारण विद्यार्थ्यांशी चुकीची वागणूक किंवा किडनॅप करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत सावध राहिले पाहिजे. त्यांनी आपल्या पालकांनाही मोबाईल वापरताना सायबर चोर कसे पैसे चोरतात, हे सांगितले पाहिजे.” यावेळी चेअरमन के. डी. कोळी, श्रीकांत घरत, कृष्णा पाटील, प्रिन्सिपॅल लाड, तसेच शिक्षक वृंद उपस्थित होता. शाळेतर्फे पोलिसांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि पोलिस दलाचे आभार मानले.
00000
