मुंबई :नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखकर, सुसह्य होण्यासाठी आणि सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी  सिताराम मास्तर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना नाना नानी पार्क बनविण्यासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये निधी देण्यात येईल, अशी सुस्पष्ट ग्वाही आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जाहीर सभेत दिली. सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नुकताच ‘आनंद मेळावा’ संपन्न झाला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव हे या आनंद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी १०८ ज्येष्ठ नागरिकांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरे करण्यात आले.   मेळाव्याला आमदार मंदाताई म्हात्रे या ज्येष्ठ नागरिकांच्या आणि सानपाडा वासियांच्या  समस्या जाणून घेण्यासाठी ‘आमदार आपल्या भेटीला’ या कार्यक्रमांतर्गत आल्या होत्या. सुरुवातीला त्यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने  शाल आणि पुष्पगुच्छ देऊन  सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी  सानपाडा येथील सिताराम मास्तर उद्यानात ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयासमोर नाना नानी उद्यान असावे, अशी मागणी केल्यानंतर  तातडीने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नाना नानी पार्कसाठी आमदार निधीतून ५० लाख रुपयांची देणगी जाहीर केली.  या घोषणेने सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांना खूप  आनंद झाला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्या वाजवून या घोषणेचे स्वागत केले.
या व्यतिरिक्त  सिताराम मास्तर उद्यानात ज्येष्ठांना चेंडू लागतात त्याच्या संरक्षणासाठी जाळी लावावी, ज्येष्ठ नागरिक संघाची सभासद संख्या १२५० असल्यामुळे आता संघाचे कार्यालय बसण्यासाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे पुढच्या शेडला स्लॅब असावा.  बस स्टॉपला शेड असावे,  सानपाडा येथे रोडला दोन्ही बाजूला पार्किंग असतात अशा अनेक समस्या ज्येष्ठ नागरिकांनी  आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडे मांडल्या. मंदाताई  म्हात्रे यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोना काळात अनेकांना आपण सहकार्य केले बेलापूर येथे मोठे रुग्णालय होणार असून, सानपाडा येथे वाचनालयाची इमारत उभी राहत आहे.  आपण जागा दिल्यास योगा सेंटर बांधून देण्यात येईल.
ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी तत्पर आहे. आपण आपल्या समस्या घेऊन माझ्या पर्यंत येऊ नका, तर मी आपल्यापर्यंत येऊन, या समस्या सोडवीन. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांना आमदार मंदाताई  म्हात्रे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.  याप्रसंगी वाढदिवस असलेल्या मानकऱ्यांना ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पुष्पगुच्छ, पेन व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.  त्याचप्रमाणे कर्जत येथील वर्षा सहलीमध्ये झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये प्रथम तीन स्पर्धक  महिलांचा  आमदारांच्या हस्ते भेटवस्तू देऊन  सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचा आढावा घेऊन  संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी प्रास्ताविक  केले,  तर मनोरंजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाच्या उपाध्यक्षा   सीमा बोराडे यांनी केले.
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना  २५० छत्र्यांचे वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमास  महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त माहिती संचालक आणि न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ, निर्मात्या अलका भुजबळ, भाजपा नेते निलेश म्हात्रे, समाजसेवक पांडुरंग आमले, रूपेश मढवी, भार्गव मढवी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोळकर, मारुती कदम, माजी उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे,  बळवंतराव पाटील, सुभाष बारवाल , शिवसेनेचे शाखाप्रमुख दत्तात्रय कुरळे, साहित्यिक गजानन लोखंडे  आदी मान्यवर उपस्थित होते. आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, खजिनदार महादेव पाटील,  सहसचिव राजेंद्र कदम,  सहखजिनदार नाना  शिंदे, मंगला मानधने, जगन्नाथ  देसाई, राजाराम घोलप, त्याचप्रमाणे  ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात, पांडुरंग वाजे, ज्ञानेश्वर जाधव ,अधिकराव पवार, नारायण साखरे इत्यादींनी विशेष  सहकार्य केले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *