अनिल ठाणेकर
ठाणे- महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदल्यांनुसार पर्यटन संचालनालयाच्या संचालक पदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (भा.प्र.से.) नियुक्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने विकास पानसरे (भा.प्र.से.) यांची पर्यटन संचालनालयाचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. गुरुवार, ३० जुलैपासून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे (एमएसएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. विकास पानसरे यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पर्यटन संचालनालयाच्या धोरणांची अंमलबजावणी, पर्यटन स्थळांचा प्रचार आणि प्रसिद्धी तसेच जगाच्या नकाशावर राज्याला एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून नव्याने ओळख मिळवून देण्याचे काम विकास पानसरे करणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील अनुभवाचा उपयोग राज्याच्या शाश्वत आणि पर्यटन विकासाला गती देण्यासाठी होईल, अशी खात्री आहे.
यापूर्वी मंगेश जोशी (भा.प्र.से.) पर्यटन संचालक म्हणून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे काम पाहत होते. मंगेश जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, राज्यातील पर्यटन स्थळांना प्रसिद्धी मिळवून देणे आणि पर्यटन क्षेत्रातील खासगी भागीदारी वाढवण्यावर त्यांनी अधिक भर दिला. यामुळे राज्याच्या पर्यटनाला देशपातळीवर तसेच जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली. मंगेश जोशी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पर्यटन संचालनालयाने त्यांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामध्ये विकास पानसरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विकास पानसरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या पर्यटनाला नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *