स्पर्धा मार्गावरील आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनास सूचना
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २०२६ येत्या ३० ऑगस्टला उत्साहात पार पडणार असून या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण मॅरेथॉन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली व स्पर्धा मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरूस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. या पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, नगरसेविका एकता भोईर, संध्या मोरे, विजया लासे, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे तसेच स्पर्धा मार्गावरील कार्यकारी अभियंता] ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सहसचिव राजेंद्र मयेकर, एकनाथ पोवळे आदी उपस्थित होते.
मॅरेथॉनची सुरुवात ठाणे महापालिका भवन येथून होणार असून, महापौरांनी या प्रारंभस्थळाचीही पाहणी केली. यानंतर महापालिका भवन, नितीन कंपनी सर्व्हिस रोड, रोड क्रमांक १६, रोड क्रमांक २२, इंदिरानगर, वर्तकनगर, उपवन मार्ग, पोखरण रोड क्रमांक २, टिकूजीनीवाडी, उथळसर आणि कळवा या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी करण्यात आली. प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सुविधा, वाहतूक नियंत्रण, रस्त्यांची गुणवत्ता आणि स्पर्धकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील बाबींची तपासणी करण्यात आली.
महापौरांनी स्पर्धा मार्गावरील रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. नितिन कंपनी सर्व्हिस रोड येथे जी कामे सुरू आहेत ती स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा संपेपर्यत बंद ठेवण्याबाबत संबंधित प्राधिकरणाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्पर्धेच्या दिवशी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने हटवून मार्ग पूर्णपणे मोकळा ठेवण्याच्या सूचना वाहतूक विभागाला देण्यात आल्या
यावेळी स्पर्धा मार्गालगत झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटून मार्ग मोकळा ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. तसेच वाहतूक पोलिसांनी स्पर्धेच्या दिवशी प्रभावी वाहतूक नियोजन करून मॅरेथॉन मार्ग निर्बध ठेवावा, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिल्या. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही महापौरांनी केले आहे.
