– अतिक्रमण, बेकायदा पार्किंगवर कारवाईचे निर्देश
दिवा, दि. ४ ऑगस्ट (आरती परब): कल्याण- शिळफाटा ते देसाई नाका या परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कल्याण फाटा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात काल महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी डीसीपी शिरसाट यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच परिसरातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यानंतर संबंधित अधिकारी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत वाय जंक्शन ते कल्याण फाटा, कल्याण फाटा ते देसाई नाका तसेच शिळफाटा ते महापे रोड या मार्गांवरील वाहतूक कोंडीची कारणे तपासण्यात आली. अनधिकृत अतिक्रमण, हातगाड्या, फेरीवाले, गॅरेज, हॉटेलसमोरील बेकायदा पार्किंग, सर्व्हिस स्टेशन तसेच महामार्गावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, कचरा हटविणे आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे अडसर दूर करण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. विविध विभागांनी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. यापूर्वीही कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत वाहतूक नियोजनाबाबत बैठक झाली होती. त्या बैठकीतील निर्णयानुसार प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कल्याण-शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत असून, प्रशासनाने समन्वयाने काम करून नागरिकांना लवकरात लवकर वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीस माजी उपमहापौर तथा नगरसेवक रमाकांत मढवी, डीसीपी शिरसाट, पोलिस निरीक्षक (पीआय) आहेर, विभागप्रमुख निलेश पाटील, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सचिन भालेराव, कार्यकारी अभियंता अंजुम, मनसेचे शरद पाटील, विनोद वास्कर, साहिल पाटील, बापूराव मुंडे, गणेश मुंडे, रवी पाटील, संतोष पाटील, पंचक्रोशीतील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *