पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या अत्याधुनिक ‘मूट कोर्ट’चे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता खांदा कॉलनी येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रविशेठ पाटील (पेण), आमदार महेश बालदी (उरण), आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महापौर नितीन पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने १९९२ पासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून विविध शैक्षणिक शाखांद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार केला आहे. उच्च शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा सातत्याने भर राहिला आहे.
संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉची स्थापना शैक्षणिक वर्ष २००९-१० मध्ये झाली. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता प्राप्त आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी आणि भविष्यातील विधी व्यवसायासाठी सक्षम तयारी करता यावी, या उद्देशाने अत्याधुनिक ‘मूट कोर्ट’ची उभारणी करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यास हितचिंतक, पालक, माजी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आणि कार्यकारी मंडळ सदस्य परेश ठाकूर यांनी केले आहे.
0000
