कल्याण: इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मान्यतेखाली गणेश मैदान, गोवंडी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कल्याणच्या वाडेघर गावातील साई फिटनेस जिमच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांमध्ये पदकांची लयलूट केली. खेळाडूंच्या या यशामुळे जिमसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धेत साई फिटनेस जिमचे मुख्य प्रशिक्षक महेश पाटील यांनी ६६ किलो मास्टर-१ रॉ बेंचप्रेस गटात सुवर्णपदक पटकावत “स्ट्राँगमन बेंचप्रेस” हा मानाचा किताब आपल्या नावावर केला. तसेच दिव्यांशु पाटील यांनी ५३ किलो सब-ज्युनियर रॉ बेंचप्रेस गटात सुवर्णपदक जिंकत “स्ट्राँगमन बेंचप्रेस” हा विशेष बहुमान मिळविला.
याच स्पर्धेत सनी सकपाळ यांनी ९३ किलो वरिष्ठ गटातील रॉ बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक, प्रथमेश इंगळे यांनी ७४ किलो सब-ज्युनियर एसबीडी प्रकारात सुवर्णपदक, सर्वेश जामदार यांनी ७४ किलो सब-ज्युनियर रॉ बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक, स्वयम ऋतु सिंह यांनी ८३ किलो रॉ बेंचप्रेस गटात ९५ किलो वजन उचलत कांस्यपदक, गायकवाड यांनी ७४ किलो ज्युनियर डेडलिफ्टमध्ये रौप्यपदक, कर्तव्या यांनी ५३ किलो ज्युनियर डेडलिफ्टमध्ये रौप्यपदक, तर यश यांनी ६६ किलो सब-ज्युनियर डेडलिफ्टमध्ये कांस्यपदक पटकावत साई फिटनेस जिमच्या यशात मोलाची भर घातली.
या सर्व यशामागे महेश पाटील यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि अथक परिश्रम यांचा मोठा वाटा असल्याचे खेळाडूंनी सांगितले. साई फिटनेस जिममध्ये तयार होत असलेली गुणवंत खेळाडूंची फळी आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमी, पालक आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
