ई20 पेट्रोलमध्ये आर्द्रता (Moisture) आणि क्लोराइडच्या उपस्थितीची तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) तपासणी
ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत
नवी दिल्ली : अलीकडेच ईबीएमएस (E20 पेट्रोल) मधील आर्द्रता आणि क्लोराइड संदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर, तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) संपूर्ण देशभर ईबीएमएस पुरवठा साखळीतील प्रत्येक टप्प्यावर अतिरिक्त आणि सखोल तपासणी केली आहे. या तपासणीतील निष्कर्षांनी इंधनाची गुणवत्ता निर्धारित मर्यादांमध्ये सातत्याने असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.काही ठिकाणी करण्यात आलेल्या दाव्यांच्या विपरीत, वैज्ञानिक पद्धतीने आखलेल्या व्यापक यादृच्छिक (Random) चाचण्यांच्या आधारे उपलब्ध पुराव्यांवरून असे स्पष्ट होते की इंधन दूषित होण्याबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही.
तेल विपणन कंपन्या आपल्या सर्व मान्यवर ग्राहकांना आश्वस्त करू इच्छितात की, इंधनाची गुणवत्ता हा त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. वाहनांच्या कार्यक्षमतेवर किंवा ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही संभाव्य बाबींची तातडीने वैज्ञानिक तपासणी करून आवश्यक ती सुधारात्मक कारवाई केली जाते.
भारत सरकारने पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी क्लोराइडची कठोर मानके निर्धारित केली आहेत आणि संपूर्ण पुरवठा साखळीत त्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी उच्च वारंवारतेची देखरेख व्यवस्था लागू केली आहे. देशभरातील रिफायनऱ्या, डिस्टिलऱ्या, डेपो/टर्मिनल्स आणि किरकोळ विक्री केंद्रांवर (Retail Outlets) पुरवठा साखळीतील विविध टप्प्यांवर क्लोराइडचे परीक्षण केले जात असून, त्यामुळे संपूर्ण पुरवठा साखळीत गुणवत्ता सातत्याने राखली जात असल्याची पुष्टी झाली आहे.
आधीपासून अस्तित्वात असलेल्या गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियांव्यतिरिक्त, तेल विपणन कंपन्यांनी प्रत्येक किरकोळ विक्री केंद्रावर दररोज ८ ते १२ वेळा पाण्याचा प्रवेश (Water Ingress) आणि घनता (Density) चाचण्या करून देखरेख आणखी मजबूत केली आहे. याशिवाय, विविध ठिकाणी मोबाइल इंधन गुणवत्ता परीक्षण प्रयोगशाळा तैनात करण्यात आल्या असून, सर्वोच्च गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी इंधन प्रयोगशाळांमार्फत चाचणी निकालांचे स्वतंत्र प्रमाणीकरणही केले जात आहे.
पुरवठा साखळीतील या बहुआयामी आणि अधिक कठोर तपासणी प्रक्रियेमुळे आमची सर्वोच्च इंधन गुणवत्ता मानके पुन्हा सिद्ध झाली आहेत.
1. रिफायनरीमधून मिळणारे मोटार स्पिरिट (MS): पेट्रोलमधील प्रत्यक्ष क्लोराइडचे प्रमाण 1 ppm पेक्षा कमी
देशातील विविध रिफायनऱ्यांमधून यादृच्छिक पद्धतीने निवडलेल्या १०० हून अधिक अतिरिक्त पेट्रोल नमुन्यांच्या तपासणीत क्लोराइडचे प्रमाण सातत्याने कमी असल्याचे आढळले असून, सर्व नमुन्यांमध्ये ते 1 ppm किंवा त्यापेक्षा कमी आहे. यावरून भारतातील मजबूत रिफायनिंग आणि वितरण प्रक्रियेमधील गुणवत्ता नियंत्रण प्रभावी असल्याचे स्पष्ट होते.
2. डिस्टिलरीमधून मिळणारे शुद्ध इथेनॉल
डिस्टिलऱ्यांकडून पुरविण्यात येणाऱ्या, मिश्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटक असलेल्या इथेनॉलमध्येही क्लोराइडचे प्रमाण निर्धारित मानकांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आढळले आहे. यावरून उत्पादन टप्प्यावर मजबूत गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येते.
तेल विपणन कंपन्या (OMCs) आणि CHT यांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष कार्यबलाने (Task Force) गेल्या १० दिवसांत देशातील ८० डिस्टिलऱ्यांमधील इथेनॉल नमुन्यांची तपासणी केली असून, सर्व नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण 3 ppm पेक्षा कमी आढळले आहे.
3. तेल विपणन कंपन्यांच्या विपणन पायाभूत सुविधांद्वारे वितरित इथेनॉल मिश्रित मोटार स्पिरिट (E20)
डेपो / टँक ट्रक : डेपो आणि टर्मिनल्सवर तपासण्यात आलेले इथेनॉल आणि ई20 नमुने निर्धारित क्लोराइड मर्यादांमध्ये आढळले आहेत. या टप्प्यावर नियमित देखरेख केली जात असल्यामुळे साठवण आणि वितरण प्रक्रियेदरम्यान इंधनाची गुणवत्ता कायम राखली जात आहे. देशभरातील विविध OMC टर्मिनल्समधून गोळा करण्यात आलेल्या ८० हून अधिक नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण 3 ppm पेक्षा कमी आढळले.
किरकोळ विक्री केंद्रे (Retail Outlets): अधिक तीव्र देखरेख कार्यक्रमांतर्गत १,००० हून अधिक नमुने घेण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत १६० नमुन्यांच्या क्लोराइड तपासणी अहवालांचे विश्लेषण करण्यात आले असून, क्लोराइडचे प्रमाण 0 ते 3 ppm दरम्यान आढळले आहे. हे अनेक शेकडो ppm असल्याच्या दाव्यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.
देखरेख प्रणालीमध्ये केवळ चार स्वतंत्र प्रकरणांमध्ये क्लोराइडचे प्रमाण वाढलेले आढळले. अशा ठिकाणांवरील पुरवठा तात्काळ स्थगित करण्यात आला. त्यानंतर मूळ कारणांचा सविस्तर शोध घेऊन आवश्यक सुधारात्मक उपाययोजना राबविल्यानंतरच पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.
4. पाण्याच्या प्रवेशाची (Water Ingress) तपासणी
देशातील सुमारे ९०,००० किरकोळ विक्री केंद्रांवर भूमिगत साठवण टाक्यांची अनिवार्य तपासणी आणि देखरेख सुरू करण्यात आली आहे. या भूमिगत टाक्यांची दररोज ८ ते १२ वेळा तपासणी केली जात असून, आतापर्यंत कुठेही पाण्याचा प्रवेश झाल्याचे आढळलेले नाही.
वरील सर्व चाचण्यांचा तक्त्याच्या स्वरूपातील सारांश CHT च्या अधिकृत संकेतस्थळावर www.cht.gov.in येथे उपलब्ध आहे. अधिक चाचणी अहवाल उपलब्ध होत जातील तसे हे संकेतस्थळ अद्ययावत केले जाईल.
तेल विपणन कंपन्या ग्राहकांना पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितात की, इंधनाची गुणवत्ता हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. संपूर्ण पुरवठा साखळीत गुणवत्ता तपासणी सातत्याने केली जाते आणि जिथे कुठे कोणताही अपवाद आढळतो, तिथे त्वरित आणि प्रभावी सुधारात्मक कारवाई केली जाते.
वरील सर्व बाबींच्या आधारे ग्राहकांनी ई20 पेट्रोलचा निर्धास्तपणे वापर सुरू ठेवावा, कारण तेल विपणन कंपन्यांच्या जाळ्यातून पुरविण्यात येणारे इंधन निर्धारित गुणवत्ता मानकांनुसार असून, ग्राहकांच्या हिताचे प्रत्येक टप्प्यावर संरक्षण करणाऱ्या मजबूत गुणवत्ता नियंत्रण आणि देखरेख यंत्रणेने ते समर्थित आहे.
