मंत्री महाजन यांचा गौप्यस्फोट
हरिभाऊ लाखे
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्यातील कामांच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव आणि ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी असलेले हुबेहूब बनावट कार्यारंभ आदेश तयार करून संबंधितांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. हा फसवणुकीचा आकडा तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला.
कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी नियुक्त नाशिक शहर तसेच राज्य राखीव दलाच्या पोलिसांना जेवण, पिण्याचे पाणी, चटया, बादल्या, चादरी आणि अन्य साहित्य पुरविण्याच्या नावाखाली हे कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. विशेष म्हणजे, प्रत्येक आदेशाची रक्कम १०० ते १५० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्याच्या कामांसाठी प्रत्यक्षात ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविली जाते. मात्र, या प्रकरणात ज्यांना बनावट कार्यारंभ आदेश देण्यात आले, त्यांनी संबंधित कामांसाठी कोणतीही ऑनलाइन निविदा भरलेली नव्हती. तरीही संशयितांनी संबंधितांकडून रोख तसेच धनादेशाद्वारे पैसे उकळून त्यांना ऑफलाइन कार्यारंभ आदेश दिले. हे आदेश शासनाच्या अधिकृत कार्यारंभ आदेशांसारखेच हुबेहूब तयार करण्यात आल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. सामान्यतः अधिकृत कार्यारंभ आदेशावर क्यूआर कोड असतो. तसेच महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव अशा प्रकारे नमूद केले जात नाही. मात्र, बनावट आदेशांमध्ये गेडाम यांचे नाव आणि केवळ ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या आदेशांची सत्यता तपासल्यानंतर त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय बळावला आहे.
या प्रकारासंदर्भात चार ते पाच जण नुकतेच आपल्याकडे आले होते. त्यांनी काही कार्यारंभ आदेश दाखविल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. सध्या त्यांच्याकडे चार बनावट कार्यारंभ आदेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मार्च आणि एप्रिल महिन्यातील हे आदेश असल्याची माहिती असून, त्याद्वारे संबंधितांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आल्याचे समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दोन आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा या प्रकरणातील संशयितांमध्ये समावेश असल्याचा दावाही महाजन यांनी केला. याशिवाय आणखी काही व्यक्ती या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची शक्यता आहे.
0000
