मैत्री ठक्करची पोलीस शिपाईपदी निवड; शिवसेनेच्या वतीने ठक्कर कुटुंबीयांसह शिवनेरी अकादमीच्या संचालकांचा सत्कार
दिवा, दि. १० ऑगस्ट : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर स्वप्नांना यशाची किनार देता येते, हे डोंबिवलीतील मैत्री विनोद ठक्कर हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फुले विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे तिचे आई-वडील विनोद विठ्ठल ठक्कर आणि आसमा विनोद ठक्कर यांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून, मैत्रीची पोलीस शिपाईपदी निवड झाली आहे.
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही मुलींना चांगले शिक्षण देण्याची जिद्द ठक्कर दाम्पत्याने सोडली नाही. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत मैत्रीनेही आपल्या ध्येयासाठी सातत्याने मेहनत घेतली. डोंबिवलीतील शिवनेरी अकादमी येथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेताना तिने शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि नियोजनबद्ध तयारीच्या जोरावर हे यश संपादन केले.
मैत्रीचे हे यश केवळ ठक्कर कुटुंबासाठी अभिमानाची बाब नसून, आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत मोठी स्वप्ने पाहणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर हे स्वतः पोलीस दलात कार्यरत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना पोलीस दल, अग्निवीर तसेच विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळावी, या उद्देशाने अकादमीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ शारीरिक प्रशिक्षण न देता मैदानी सराव, लेखी परीक्षेची तयारी, मानसिक तयारी, नियोजन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन अशा विविध अंगांनी प्रशिक्षण देण्यावर अकादमीचा भर आहे. डोंबिवलीपुरती मर्यादा न ठेवता सातारा, सांगली, मुंबई उपनगर, ठाणे तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थीही या अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत.
आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना खीळ बसू नये, यासाठी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षणासाठी आवश्यक सहकार्य, आर्थिक मदत आणि मानसिक आधार देण्याचे सामाजिक कार्य शिवसेना परिवाराच्या माध्यमातूनही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मैत्री विनोद ठक्कर हिची पोलीस शिपाईपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेच्या वतीने तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत मैत्री, तिचे आई-वडील, बहीण आणि शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी ठक्कर कुटुंबीयांशी संवाद साधताना शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि गरजू कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात आले. तसेच मैत्री आणि तिच्या कुटुंबाच्या भविष्यातील वाटचालीत आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही देण्यात आली. “फुले विकणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टातून पोलीस दलात दाखल झालेली मैत्री ही केवळ एका कुटुंबाच्या संघर्षाची यशोगाथा नाही, तर परिस्थितीशी दोन हात करून स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीसाठी प्रेरणेची ज्योत आहे,” अशा शब्दांत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी मैत्रीच्या यशाचे कौतुक केले.
मैत्रीच्या यशामागे तिच्या आई-वडिलांची अथक मेहनत, मुलींना चांगले शिक्षण देण्याची जिद्द, मैत्रीची प्रामाणिक मेहनत आणि शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर यांचे मार्गदर्शन व नियोजनबद्ध प्रशिक्षण यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. “परिस्थितीपेक्षा जिद्द मोठी असते” हा संदेश मैत्री ठक्करच्या यशाने अधोरेखित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *