कल्याण : अचीवर कॉलेज, कल्याण येथे ९ ऑगस्टला ठाणे जिल्हा गतका असोसिएशन व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका गतका असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय गतका निवड चाचणी उत्साहात पार पडली. या चाचणीत विविध स्पोर्ट्स अकॅडमीमधून ७० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय गतका अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना पुढील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
निवड चाचणीसाठी असोसिएशन ऑफ गतका, महाराष्ट्रच्या सचिव प्रा. आरती चौधरी, अचीवर कॉलेजचे संचालक डॉ. सीए महेश भिवंडीकर, ठाणे जिल्हा गतका असोसिएशनचे सचिव मंथन पवार, एजीएमचे आयटी हेड स्मित चौधरी, कल्याण-डोंबिवली गतका असोसिएशनचे सचिव धीरज कोट तसेच टेक्निकल ऑफिशियल धनुष, बाबू, शरणकुमार, संजय, मानसी पवार, प्रेम पोटे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंचा उत्साह वाढवत त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्याने निवड चाचणी सुरळीतपणे पार पडली.
०००००००००
