मुख्यमंत्र्यांकडे सीटूची मागणी
अनिल ठाणेकर
ठाणे : कोविड-१९ महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अंगणवाडी व मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचर तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा, अशी मागणी सीटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामविकास विभागाने १३ मार्च २०२० व २४ मार्च २०२० रोजी काढलेल्या सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांनी जनजागृती, महाआयुष सर्वेक्षण, आरोग्यविषयक उपाययोजना तसेच कोविडसंदर्भातील विविध कामे अहोरात्र आणि जीव धोक्यात घालून केली. या कर्मचाऱ्यांना नियमित मानधनाव्यतिरिक्त दरमहा ₹१,००० प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
मात्र, शासनाच्या सूचनांनंतरही संबंधित कर्मचाऱ्यांना आजतागायत हा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषदांनी ही जबाबदारी ग्रामपंचायतींची असल्याचे सांगितले असून, ग्रामपंचायती निधीअभावी भत्ता देण्यास असमर्थ असल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड योद्धा म्हणून काम केलेल्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना परिपत्रकानुसार प्रत्येकी सुमारे ₹२४,००० इतका प्रोत्साहन भत्ता तातडीने मंजूर करून वितरित करण्याचे आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी सिटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *