ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक राजकारणाचा महत्त्वाचा भाग असलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा हिटलरवादी विचारसरणीवर आधारित असल्याचा आरोप लोकशाहीर संभाजी भगत यांनी केला. संघाला देशात विरोधी पक्ष नकोत, संघाचा संविधानाला मनापासून विरोध आहे. संविधान जाळणारे आणि ते जाळल्यानंतर आनंद व्यक्त करणारे लोक आहेत, असा दावा करत संघाच्या हिटलरवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात पर्यायी सांस्कृतिक राष्ट्रवाद उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संभाजी भगत यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त महा अंनिस ठाणे शहर शाखेच्या वतीने १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन, सातारा या संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत सुबोध मोरे, महा अंनिस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत, महा अंनिस प्रकाशन विभागाचे कार्यवाह तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, महा अंनिस केंद्रीय सदस्य व कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सुशीला मुंडे, महा अंनिस ठाणे शहर कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर, प्रधान सचिव अशोक मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर हे समाजवादी, गोविंद पानसरे साम्यवादी, तर एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश हे सेक्युलरवादी विचारांचे होते. तरीही कोणताही भेदाभेद न करता त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे आपणही समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी किंवा सेक्युलरवादी असा भेदभाव न करता संघाच्या हिटलरवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात एकत्र उभे राहून पर्यायी सांस्कृतिक राष्ट्रवाद उभारला पाहिजे, असे आवाहन संभाजी भगत यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही आपले विचार मांडले. हिटलरने आर्यवंशाच्या श्रेष्ठत्वाचा दावा करत सुमारे ६० लाख ज्यूंची हत्या केली. हिटलर हा संघाच्या विचारविश्वातील आदर्श असल्याने संघ आणि हिटलर यांच्यात वैचारिक संवाद सुरू असल्याचे केतकर यांनी म्हटले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महा अंनिसच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने चळवळीची गीते सादर करण्यात आली. संविधानाच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल महा अंनिस ठाणे शहर शाखेतील अशोक मोहिते, किशोर भोईर, प्राचार्य मच्छिंद्र तिगोटे, विजय गडलिंग, छाया ठाणेकर, दर्शना ढोले आणि प्रमोद तामसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
००००
००००००००
