– झैद – प्राजक्ताला विजेतेपद
मुंबई : सोमेश्वर फाऊंडेशनच्यावतीने व नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तसेच झेनेटीक स्पोर्ट्सच्या सहकार्याने सनिज वर्ल्ड, सनी स्पोर्ट्स किंग्डम, पुणे येथे संपन्न झालेल्या कै. विनायक निम्हण तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या सागर वाघमारेचा १७-१२, १६-१२ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी
झैदने मुंबईच्या प्रशांत मोरेचा १५-२५, २५-२२ व २५-१० असा तर सागरने पुण्याच्याच अभिजित त्रिपनकरचा २५-६, २५-१९ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा २५-१०, २५-११ असा सरळ दोन सेटमध्ये प्रभाव केला.
तर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या मधुरा देवळेवर २३-१९, १७-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून आपल्या विजयावर शिक्कमोर्तब केला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी प्राजक्ताने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला २३-२१, १२-२५ व २५-६ असे तर मधुराने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणला २५-७, २१-१७ असे पराभूत केले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला रंगतदार तीन सेटमध्ये २४-१०, १४, २५ व २५-१२ अशी मात केली.
स्पर्धेतील विजेत्यांना उद्दोजक मधुरा वाळुंज, ज्येष्ठ राष्ट्रीय विजेते व शिव छत्रपती पुरस्कारार्थी सुहास कांबळी यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर अहमद खान, यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव सुशील गुजर आणि राज्य कॅरम असोसिएशनचे सहसचिव आणि स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते उपस्थित होते. मधुरा वाळुंज यांनी खेळाडूंचे कौतुक करताना कै. विनायक निम्हण यांना क्रीडा क्षेत्राची आवड असून ते स्वता उत्कृष्ट कॅरम खेळत असत असे सांगितले. तर अरुण केदार यांनी प्रतिवर्षी कॅरम स्पर्धेचे आयोजन करत असल्याबद्दल सोमेश्वर फाऊंडेशन व स्पर्धेचे आश्रयदाते नगर सेवक सनी निम्हण यांचे विशेष आभार मानले. तसेच स्पर्धेचे नीट नेटके आयोजन केल्याबद्दल राज्याचे सहसचिव,सहकारी व स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते यांचे कौतुक केले.
००००
