आंबेकरजींच्या नावे पोस्ट तिकिटाचे सचिन अहिर यांच्या हस्ते अनावरण
मुंबई- राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महात्मा गांधी सभागृहात मजदूर संघाचे आद्य संस्थापक कामगारमहर्षी स्वर्गीय गं.द. आंबेकर यांची १२० वी जयंती संपन्न झाली. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या नावे पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करून इतिहास रचला. याप्रसंगी महाराष्ट्र सर्कल,चीफ पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये आणि अन्य अधिकारीवर्ग यावेळी उपस्थित होता. प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, गं.द.आंबेकरजींनी आपली संपूर्ण हयात कामगार कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजव ली. त्यांनी आपल्या भाषणात गं.द. आंबेकरजींचा समग्र जीवनपट कामगारांसमोर ठेवला.
गिरणी कामगार घरांचा आणि बंद गिरण्यांचा प्रश्न लवकर च मार्गी लागेल,असे सांगून सचिन अहिर कामगार आणि कार्यकर्त्यांपुढे बोलताना आपल्या भाषणात पुढे म्हणाले, ज्याकाळात कामगार संघटना बांधणे कठीण होते,अशा १९३८ मध्ये गिरणी कामगारांची संघटना बांधून त्यांना न्यायहक्क मिळवून दिला आणि त्यांचे जीवनमान उंचाविले. उद्योग टिकला तर कामगार जगेल, हे आजचे वास्तव आंबेकरजींनी त्याकाळात अनुसरले! असेही अहिर आपल्या भाषणात म्हणाले. याप्रसंगी गिरणी कामगारांच्या इयत्ता १० वी १२ वी उत्तीर्ण मुलांचा तसेच नातवंडांचा सुमारे २ लाख रूपयांवर आंबेकर शैक्षणिक सहाय्याने गुणगौरव करण्यात आला.
याच ठिकाणी आंबेकरजींच्या स्वप्नातील “राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.सर्वश्री निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेंकर, बजरंग चव्हाण,सुनील बोरकर,मारुती शिंत्रे, शिवाजी काळे,विलास डांगे,बळीराम महाडिक,मनोहर पाटील,सौ स्मिता शिंदे, सौ.सुनिता खराटे आदी संचालक उपस्थित होते. सदस्य कामगारांच्या इयत्ता दहावी बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहाय्य देऊन गुणगौरव करण्यात आला. या निमित्ताने संघटनेचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त त्यांच्या कामगार चळवळीतील निष्ठामयी कामाबद्दल त्यांचा तसेच प्रसिद्धीप्रमुख काशिनाथ माटल यांच्या साहित्य लेखणीतील अद्वितीय कामगिरीबद्दल उपसभापती सचिन अहिर आणि गोविंदराव मोहिते तसेच उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमप्रसंगी जी.बी.गावडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
